Skip to content Skip to footer

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून पुणे-लोणावळा विशेष लोकल सेवा सुरु

दिवसभरात दोन्ही स्थानकांदरम्यान होणार दोन फेऱ्या

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे ते लोणावळा विशेष लोकल सेवेला आजपासून (दि. १२) सुरुवात झाली. पुण्याहून पहिली लोकल सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन लोणावळ्याला ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. तसेच लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेली लोकल सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुणे स्थानकात पोहोचली.

तसेच दुसरी लोकल पुण्याहून संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांनी सुटणार असून ती रात्री ७ वाजून २७ मिनिटांनी लोणावळा स्थानकात पोहोचेल. तसेच लोणावळ्याहून संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पुण्यात रात्री ७ वाजता पोहोचणार आहे.

या दोन्ही विशेष लोकल येताना आणि जाताना पुणे ते लोणावळा या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबेल. दरम्यान, राज्य सरकारने या विशेष लोकल सेवेसाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी आणि ही प्रक्रिया पाहण्यासठी नोडल ऑफिसर म्हणून घोषित केले आहे. पुणे पोलिसांकडून देण्यात येणारी ही ओळखपत्रे क्यू आर कोडवर आधारित असतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी हे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

ही विशेष उपनगरीय लोकल सेवा राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेशी संबंधीत कर्मचाऱ्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5