Skip to content Skip to footer

औरंगाबादेत २ वर्षांत ११ एटीएम फोडण्याचा झाला प्रयत्न

औरंगाबाद : २ वर्षांच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. यापैकी केवळ सेव्हन हिल येथील एटीएम फोडण्यासाठी मशीनवर पिस्टलमधून गोळ्या झाडणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने पकडले होते. उर्वरित घटनांतील गुन्ह्यांची केवळ पोलीस ठाण्याच्या डायरीला नोंद घेऊन पोलीस मोकळे झाले.

बायपासवर २५ लाखांसह एटीएम पळविल्यानंतरही पोलीस एटीएमच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे शनिवारी रात्री घडलेल्या दुसऱ्या घटनेवरून समोर आले आहे. रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा मात्र दोन्ही घटनांवरून फोल ठरत आहे.  सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री बीड बायपासवरील २५ लाखांसह एटीएम मशीनच उचलून नेले. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी रात्री पडेगावमधील मिसबाह कॉलनीतील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले. तेथील एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लुटण्याचा  चोरट्यांचा प्रयत्न एका सतर्क नागरिकामुळे फसला.

मात्र, या दोन्ही घटनांच्या निमित्ताने शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सुमारे साडेचारशे एटीएम सेंटर आहेत. यातील सर्वाधिक एटीएम हे भारतीय स्टेट बँकेचे आहेत. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले नाहीत. शहरातील केवळ खाजगी बँक ांच्या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक असतो. पोलीस असताना एटीएमच्या सुरक्षेसाठी खर्च कशाला करायचा, अशी बँकांची भूमिका आहे.

२०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गस्तीसाठी चार्ली पथक नेमले होते. या चार्लींना एटीएम सेंटरला दर दोन ते तीन तासांनी भेट देणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे गस्तीवरील चार्ली पोलिसांचे एटीएम सेंटरकडे सतत लक्ष असे. अमितेशकुमार यांची बदली झाली आणि चार्ली पोलीस बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून शहरातील गस्त पुन्हा पोलीस ठाण्याच्या बीट हवालदारांकडे सोपविण्यात आली. बीट हवालदार त्यांच्याकडील गुन्ह्यांच्या तपासातून सवड मिळाल्यानंतर सोयीनुसार गस्त घालत असतात. याचीच संधी चोरटे साधत आहेत.
गस्त वाढविली
एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे. शहरातील एटीएम पळविण्याच्या पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी गस्त वाढविली आहे. एटीएम सुरक्षेसंदर्भात एटीएम संचालकांसोबत आम्ही बोलत आहोत. एटीएम फोडणाऱ्या दोन गँगच्या मागे आम्ही आहोत, तसेच राज्यात चार, सहा दिवसांत, अशा अनेक घटना घडल्या आहेत, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5