सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून शिवभोजन थाळीला ५ कोटीची मदत !

सिद्धिविनायक-मंदिर-ट्रस्-Siddhivinayak-Temple-Truss

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवभोजन थाळीला संपूर्ण राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले होते. शिवभोजन थाळीच्या वाढत्या मागणीमुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिले होते. त्यावरुन रोजच्या १८ हजारावरुन आता या थाळींची संख्या ३६ हजार करण्यात आली होती. आता या पाठोपाठ शिवभोजन थाळीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने सुमारे पाच कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांचे सहकार्य करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात केवळ दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना सुरु केली आहे. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात संचालक मंडळ यांनी दुपारी सर्वसामान्य लोकांची भूक भागवणाऱ्या या प्रकल्पाला काहीतरी मदत करावी, या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास हे नेहमी लोकांच्या भल्यासाठी काम करत असल्यामुळे यात राजकीय हेतू नाही,असेही बांदेकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here