कधीही प्रकाशात न आलेल्यांनी शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला – सचिन सावंत

कधीही-प्रकाशात-न-आलेल्या-Never-illuminated-never-before

राज्यात महाविकास आघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. या शॅडो कॅबिनेट मध्ये मनसेच्या अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे. परंतु आता मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सर्व स्थरातून टीका होताना दिसून येत आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मनसेवर जोरदार हल्ला चढविण्यात आला. “शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता, तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसले, अशा शब्दांत सामनातून मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची खिल्ली उडवण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा मनसेवर जोरदार हल्ला चढवला होता.

 

शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे, जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित! अशी खोचक टीका प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनसेवर केली आहे. या शॅडो मंत्री मंडळावर मत व्यक्त करताना मंत्री अनिल परब म्हणाले की, मनसेने विधायक सूचना करण्यासाठी हे केले असेल, तर त्या सूचनांचा आम्ही विचार करू ! मात्र कोणी राजकारणासाठी करत असेल, तर आम्ही याचा विचार करणार नाही” असे स्पष्टीकरण दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here