महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, खासदार माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महापुरात नुकसान झालेल्या जिल्हयातील ८१९३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पंचगंगा, वारणा व कृष्णा नदीला आलेल्या महापूरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
महापूरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रतिगुंठा ९५० रुपयेप्रमाणे कर्जमाफी तर ४५० रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. मात्र सामाईक क्षेत्राची नोंद, संमतीची खाती, देवस्थान जमिन आदी खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता.
या शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने मार्गदर्शनासाठी शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी सामायिक व देवस्थान जमिनी असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र संमतीच्या कर्जखात्यांना कर्जमाफी नव्हे तर नुकसानीचा लाभ देण्याचे आदेश सहकार आयुक्त यांनी दिले.
या आदेशाने सहकार आयुक्तांनी सर्व बँका व जिल्हा उपनिबंधक यांना पत्र पाठवून नुकसान भरपाई रोखली आहे. महापूरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. तर या कोरोनाच्या हहकारामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला अाहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात आला आहे.
याचा सर्वाधिक फटका हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिरोळ, हातकणंगले या तालुक्यतील व करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तरी महापुरामध्ये नुकसान झालेल्या पण सातबारा पत्रकी सामायिक / संयुक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेबाबत सहकार विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.