बाधित रुग्णांची साखळी तुटते, कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा

बाधित रुग्णांची साखळी तु-A chain of infected patients

बाधित रुग्णांची साखळी तुटते, कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा

कल्याण-डोंबिवली शहरांत गेल्या दीड महिन्यात विदेशातून आलेले स्थानिक रहिवासी, लग्न-हळदी समारंभात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाली होती.

यापैकी अनेक जण विलगीकरणात अथवा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. यापैकी पहिला रुग्ण सापडलेल्या डोंबिवलीतील म्हात्रेनगर भागात गेल्या २० दिवसांत ताप, सर्दी, खोकल्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतून स्थानिक रुग्णांची करोना साथप्रसाराची साखळी तुटू लागली आहे, असा दावा आरोग्य यंत्रणेमार्फत केला जात आहे.

महापालिका हद्दीत बुधवारी नऊ करोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये डोंबिवलीत एकही रुग्ण आढळला नाही. सर्व रुग्ण कल्याण पूर्व, पश्चिम भागातील आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. बाधित रुग्णांमध्ये पोलिसांची संख्या अधिक आहे.

करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी दीड महिन्यापासून सुरू आहे. याचे सकारात्मक परिणाम काही भागात दिसू लागले आहेत. महापालिका हद्दीत एकूण २३३ रुग्ण सापडले असले तरी त्यामधील ७६ रुग्ण उपचार घेऊन घरी आले आहेत. एकूण १५४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका हद्दीतील बहुतांशी रहिवासी नोकरीनिमित्त मुंबईत रुग्णालये, मुंबई पालिका, पोलीस, बँक, दूरचित्रवाणी वाहिन्या, मंत्रालय, खासगी अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांमध्ये कामाला जातात.

या चाकरमान्यांमधील सुमारे ११० हून अधिक करोनाबाधित रुग्ण हे मुंबईतील सेवेकरी आहेत. महापालिका हद्दीत विदेशातून आलेले रहिवासी, शेलार-भोईरांच्या हळदी-लग्नात सहभागी झालेली बहुतांश मंडळी करोनामुक्त होत आहेत. स्थानिक रहिवासी कोरोनामुक्त होत असल्याने शहर करोनाच्या साखळीतून लवकरच बाहेर पडेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here