Skip to content Skip to footer

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न! – मुख्यमंत्री

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न! – मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ येत असून, ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधुस होऊ नये, मनुष्य हानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह व सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व टीम्स सर्व आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून, सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनी ही घरातच राहणे हिताचे असून, वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. समाजमाध्यमांद्वारे जनतेला थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्रसरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एन.डी.आर.एफ.च्या १५ व एस.डी.आर.एफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहिसलामत बाहेर येऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतू आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावे. दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, घरात राहण्यातच सर्वांचे हित आहे, असा संदेश मुख्यमंत्री उद्दाहव ठाकरे यांनी दिला आहे.

Leave a comment

0.0/5