‘बचेंगे तो और भी खेलेंगे’: यंदा दहीहंडीला स्थगिती, समन्वय समितीचा निर्णय

‘बचेंगे तो और भी खेलेंगे’-‘Survive then play more’

जून महिना सरत आला की मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी ‘बजरंग बली की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा आरोळ्या ठोकत मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला सुरुवात होते. मात्र यंदा करोनाच्या साथीमुळे परिस्थिती अगदीच वेगली दिसत आहे. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करु नये असं आवाहन दहीहंडी उत्सव समन्वय समितीने केलं आहे. ‘बचेंगे तो और भी खेलेंगे असं म्हणत यंदा दहीहंडी उत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणारे आणि तो बघणारे अशी प्रचंड गर्दी होते. आता गर्दी होणे योग्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नये, असे आवाहन मुंबईतील समस्त गोविंदा पथकांना करण्यात आले आहे. पथकांनी स्थानिक पातळीवर सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत जन्माष्टमीची पूजा करावी, असे दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथकाचे (ताडवाडी) प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उत्सवासंदर्भात भेट घेण्याचा निर्णय समन्वय समितीच्या ‘झूम अ‍ॅप’च्या माध्यमातून झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दहिहंडी समन्वय समितीच्या पदाधिका-यांच्या बैठकीत दहिहंडी उत्सव २०२० संदर्भात महत्वाच्या ठरावांना समंती देण्यात आली. हे ठराव खालीलप्रमाणे:

१) २०२० हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यच्या दृष्टीने सर्वांना जरा अवघडच जात आहे.

२) गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच. हे संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहेच असं दिसून येईल. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृध्दांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो बाहेर काढलेला आहे हे ही तितकेच सर्वश्रुत सत्य आहे.

३) २०२० च्या या कोरोना संकटाने, या महामारीने मात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे. कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी कोण्या ठराविक व्यक्ती अथवा संस्थेनं घेणं अवघड दिसत आहे.

४) या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करुन दहिहंडी समन्वय समितीने असा निर्णय घेतला आहे की यावर्षी ‘श्रीकृष्णजन्म’ (अष्टमीची पुजा) हा अत्यंत साध्या पध्दतीने ( अर्थातच सामाजिक अंतराचे भान ठेऊनच ) साजरा करायचा. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल.

निर्णयात बदल नाही

मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुस-यादिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे दहिहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे. या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या या सर्व निर्णयांवर समिती यावर्षीसाठी ठाम असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर सलामत तो …

“सर सलामत तो पगडी पचास” किंवा बचेंगे तो औरभी लडेंगे /खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा सण/उत्सव पुढीलवर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो ही महामारी लवकरात लवकर दूर होवो अशी प्रार्थनाही समितीने जारी केलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here