कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना नियंत्रणासाठी लोक-People for corona control

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविड १९ चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून, आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.

वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

टास्क फोर्समुळे परिणाम

राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढेही सदर मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल, असा विश्वास ही त्यांनी दर्शविला.

व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन ९५ मास्कचा पुरवठा १ सप्टेंबर नंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here