सुटी सिगारेट आणि विडीच्या विक्रीला ठाकरे सरकारची बंदी.
राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर ठाकरे सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे धूम्रपानाला काही अंशतः रोखण्यात येऊ शकते.
आज राज्यातील मोठा तरुण वर्ग व्यसनाकडे वळत असल्याने सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
मात्र, या आदेशाचा कितपत परिणाम होतो हे येणाऱ्या दिवसात समोर येईल तसेच या आदेशाची कितपत अंबलबजावनी करण्यात येते हे सुद्धा पाहावे लागणार आहे. तसे पाहिले तर सुटय़ा सिगारेट्स विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सिगारेटचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. हा ‘वैधानिक’इशारा सिगारेट शौकीन मनावर घेत नाहीत. एक किंवा दोन अशा सुटय़ा स्वरूपात सिगारेट्सची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्या विकत घेणाऱ्याला अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा ‘वैधानिक इशारा’ लेखी स्वरूपात देता येत नाही. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे या सगळ्याला आळा बसण्याची शक्यता आहे.