कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर राबवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले आहे. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता.
या बैठकीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्य संपन्न व्हावा यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर न्यायला हवा.