दलित मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते आणि कोणीही उसळून उठत नाही – खा. संजय राऊत
हाथरस, उत्तरप्रदेश येथे दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. या देशात एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. एका दलित मुलीवर अत्याचार, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही अशी टीका करताना न्यायासाठी सर्वांनी लढलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे.
“उत्तर प्रदेशात झालेली घटना दुर्दैवी आहे. उत्तर प्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. तिथे राम मंदिरची उभारणी होत आहे. तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरवी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दुसरीकडे अशी घटना घडली, कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून आंदोलन चालवतात ते आज कुठे आहेत? तो मीडिया कुठे आहे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्री सेलिब्रेटीच हवी आहे का?”, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
“हाथरसमधील मुलगी आपली कोणी लागत नाही का? तीसुद्धा आपलीच आहे. त्याविषयी ट्विटर, मीडियात मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं दिसत नाही. रामदास आठवले जे नटीच्या घऱी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते गेले ते कुठे आहेत? मी एक व्यक्ती म्हणून नाही तर प्रवृत्ती म्हणून सांगत आहे,”असंही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “दिल्लीत जेव्हा निर्भया कांड झाला तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो. मीडियाची त्यात महत्त्वाची भूमिका होती. आज जे सत्तेत आहेत ते रस्त्यावर उतरले होते. पण हाय़रस प्रकरणात निराशा दिसतीये”.