‘फिल्म सिटी’ ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर… – अनिल देशमुख
हाथरस, उत्तरप्रदेश येथे दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार तसेच तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट पसरली आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा उत्तरप्रदेश मधील कायदा, सुव्यवस्था तसेच महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुढे आला असून, यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री योगी सरकारला सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी हाथरस येथे एका दलित मुलीवर सवर्ण जातीच्या समाजातील लोकांनी बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज दिल्लीच्या सफरजंग येथील रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या चौघांनी तिच्यावर बलात्कार करून, जीभ कापून तिची मान मोडण्याचा प्रयत्न केला होता. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
यावर ट्विट करताना देशमुख म्हणाले आहेत की, उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! योगी आदित्यनाथ गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. “यूपी की निर्भया को न्याय दो” असे ट्विट त्यांनी केले आहे.