कोरोनाच्या संकटात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सदर कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० लाखाची सानुग्रह मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. याच पाश्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनच्या संसर्गमुळे मृत्यू झालेल्या तीन पोलिसांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश आज सुपूर्त करण्यात आला.
सहायक फौजदार अबासाहेब गारुडकर (पोलिस मुख्यालय), संजय पोटे (सोनई) व संतोष शेळके (पारनेर) या तीन पोलिस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. ठाकरे सरकारने केलेल्या घोषणेनुसार त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्यातच ही घोषणा केली होती. या निर्णयासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. तसेच एकमताने या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आला.
कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱयांच्या खाद्यावर सोपवण्यात आली होती मात्र ही जबाबदारी पेलवताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण लागून अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. पुढे करोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सरकाराने हा निर्णय घेतला.