गिरणा धरणात अज्ञात व्यक्तीकडून विष प्रयोग, अनेक मासे मृत ; मंत्री दादाजी भुसे यांचे चौकशीचे आदेश
गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असताना देखील काही समाज कंटकांनी पाण्यात विषप्रयोग केला होता. या विषप्रयोगामुळे धरणातील मासळी मोठ्या प्रमाणात मृत पावली आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच मनपा आयुक्त, उप महापौर आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाऊन त्याठिकाणी पाहणी केली होती.
याच गिरणा धरणातून मालेगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने रात्रीपासून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणारे पंपींग स्टेशनमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तिथे मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासोबतच कर्तव्यास असणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृत माश्यांची विक्री होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच ठेकेदाराला ताब्यात घेऊन सदर मृत मासळी नष्ट करण्याचे आदेश भुसे यांनी दिलेले आहेत.
गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विविध भागात पाणी पुरवठा योजना राबविल्या जातात. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय देखील सुरू असतो. पारंपारीक पद्धतीने मासेमारी न करता मासेमारी सुकर होण्यासाठी काही समाजकंटक विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे.