राज्यात मनोरंजन क्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा, मंत्री अमित देशमुख यांची घोषणा!
मराठी, हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषेमधील चित्रपट, दूरचित्रवाहिनी, मालिका आणि जाहिराती यांच्या निर्मितीची संख्या लक्षात घेता मनोरंजन क्षेत्रासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवे धोरण निश्चित करण्यात येणार असून, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलेली आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या संचालकांची बैठक गुरूवारी मंत्रालय येथे देशमुख यांच्या दालनात पार पडली. नव्या धोरणात चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच, लोककला, माहितीपट, जाहिरातपट यांचा समावेश केला जाईल. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या धोरणाचे प्रारुप तयार करण्यात यावे, असेही देशमुख यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.
धोरणाचे प्रारुप सांस्कृतिक कार्य विभागाला सादर केल्यानंतर हे धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. मनोरंजन क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याने या क्षेत्रास उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळण्याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती देणे आवश्यक आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठीही सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.