मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर…
मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहे. या सुनावणीची वर्गवारी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने बदलून तीन न्यायाधीशांऐवजी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ अशी केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर या घटनापीठाकडे सुनावणी होणार आहे. घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. घटनापीठ आणि त्यात कोणत्या न्यायाधीशांचा समावेश असावा हा निर्णय सरन्यायाधीश शरद बोबडे घेणार आहेत.
मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठामार्फत घेण्याचा निर्णय यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतला होता. मात्र हा निर्णय घेताना मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. घटनापीठ तातडीने स्थापन करावे म्हणून राज्य सरकारने बुधवारी पुन्हा अर्ज केला. त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र, यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळीच ही केस घटनापीठाकडे पाठविण्याबाबत झालेल्या निर्णयाप्रमाणे या खटल्याची वर्गवारी बदलण्यात आली आहे. ही एक तांत्रिक प्रक्रिया असल्याचे विधी तज्ञांचे मत आहे.