अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक वाहिनीने टीआरपी वाढवण्यासाठी दिले १ कोटी रुपये
TRP घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची अफरा-तफर झाल्याचे आता उघड झाले आहे. त्यातच रिपब्लिक वाहिनीने TRP वाढवण्यासाठी जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत एक कोटीहून अधिक पैसे स्वीकारले. या रकमेतील काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली, अशी माहिती एका आरोपीने दिली आहे, असा दावा गुन्हे शाखेने केला आहे. ही माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दंडाधिकारी न्यायालयासमोर सादर केली आहे.
पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिषेक कोळवडे याने रिपब्लिक वाहिनीचा TRP वाढविण्यासाठी दरमहा १५ लाख रुपये मिळत असे. यापैकी काही रक्कम वाहिन्यांचा वितरक आशिष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली, तर काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली, अशी माहिती दिली.
आरोपीने यातील काही रक्कम TRP मोजण्यासाठी बॅरोमिटर यंत्र बसविलेल्या ग्राहकांना साथीदारांच्या मदतीने वाटली. तर काही रक्कम स्वत:कडे ठेवली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी अभिषेकच्या घराची आणि आशिष चौधरी याच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडतीत ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेकच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत.