ऑनलाइन शॉपिंगद्वारे फसवणूक

ऑनलाइन-शॉपिंगद्वारे-फसवण-Online-shopping-through-fraud

ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनीही सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सध्या सर्वत्र ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे; परंतु ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. नुकताच वसईतील एका महिलेला ऑनलाइन शॉपिंगने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन शॉपिंगदरम्यान साडेपाच हजार रुपये किमतीचा ड्रेस मागविण्यात आला होता; परंतु पार्सल हाती येताच त्यामध्ये जुनाट झालेल्या साडय़ा देण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

वसई पश्चिमेला राहणाऱ्या गीता गुप्ता या महिलेने फेसबुकवरील एका पेजवरून साडेपाच हजार रुपयांचा ड्रेस सवलतीत मिळत असल्याने तात्काळ ऑनलाइन ऑर्डर केला होता. दोन दिवसांत त्याची डिलिव्हरीही देण्यात आली. मात्र पार्सल उघडताच भलताच प्रकार समोर आला.

डिलिव्हरी बॉयने आणलेल्या पार्सल बॉक्समध्ये त्यांना जुन्या झालेल्या साडय़ा मिळाल्या. कदाचित चुकून हे पार्सल आपल्याला देण्यात आले असल्याचा अंदाज लावत गुप्ता यांनी पुन्हा ड्रेस ऑर्डर केला. ज्या वेळी या ड्रेसची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यातही पुन्हा जुनाट असलेल्या साडय़ांचे पार्सल त्यांना मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाणे गाठून सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनीही सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here