परदेशी कंपन्यांसोबत ठाकरे सरकारचा ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. करोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान आहे असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.
आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या करोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.