Skip to content Skip to footer

महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष.


महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष.

महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून, महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून, मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महिलांनी आता बचतगट आणि त्यांची पारंपरिक पापड, मसाले आदी उत्पादने याच्या पलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ च्या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादन निर्मितीची सांगड घालावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यासाठी माविम, उमेदच्या अर्थात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान उपक्रमांना व्यापक स्वरुप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेवाक्षेत्राची होत असलेली प्रचंड वाढ पाहता महिलांनी आता केवळ वस्तूनिर्मितीपर्यंतच मर्यादित न राहता सेवाक्षेत्रातील संधींकडे पाहिले पाहिजे, एनआरएलएमने ज्याप्रमाणे बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर आणली आहेत, तसेच माविम ज्या प्रकारे स्वत:चे ई- बिझनेस प्लॅटफॉर्म विकसित करत आहे त्याप्रमाणे महिलानिर्मित उत्पादनांना व्यापक प्रमाणात ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे, असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

Leave a comment

0.0/5