फोर्स वनचे शूर आपले संरक्षण करतात, आपण त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ! – मुख्यमंत्री
विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब उपस्थित होते.
फोर्स वन विशिष्ट हेतूने स्थापन करण्यात आले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संरक्षणासाठी तत्पर, सज्ज राहतात. आपले जवान फोर्स वन मध्ये ऐच्छिक रित्या सहभागी होतात. त्यांची जिद्द, मेहनत कौतुकास्पद अशी आहे. हे जवान शूर आहेत, हे आपण पाहिले आहे. ते आपले संरक्षण करतात तर त्यांच्या आयुष्याचे संरक्षण करणे, काळजी घेणे आपले कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार फोर्स वन मधील कृती गटातील जवानांना मुळ वेतनाच्या शंभर टक्के, तांत्रिक व प्रशासकीय पदांना मुळ वेतनाच्या २५ टक्के, आणि नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्रातील पदांना मुळ वेतनाच्या ५० टक्के असा अधिकचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “फोर्स वन एक समर्पित असे दल आहे. त्यामध्ये ऐच्छिक म्हणजे स्वत:हून जवान सहभागी होतात. ते खडतर प्रशिक्षण घेतात. परिश्रम करतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.”