दिवाळी सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहे हे विसरू नका. सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा राज्यातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्या दिल्या आहेत. “यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया”, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.