Skip to content Skip to footer

…म्हणून गृहमंत्र्यांनी मानले आयर्लंडच्या FB अधिकाऱ्यांचे आभार, मुंबई-धुळे पोलिसांचंही केलं कौतुक

“वेळेवर माहिती देणाऱ्या फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो”

फेसबुकवर लाइव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील धुळ्याच्या तरुणाचा आयर्लंड येथील फेसबुकच्या अधिकाऱ्यांमुळे जीव वाचला. युवक लाइव्ह आत्महत्या करण्याच्या तयारीत असतानाच फेसबुकच्या आयर्लंडयेथील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आणि अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकाला वाचवण्यात आलं. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेळेवर माहिती दिल्याबद्दल आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांचे आभार मानलेत. याशिवाय मुंबई व धुळे पोलिसांनी सतर्कता दाखवत संयुक्तपणे केलेल्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलंय.

“आयर्लंड येथील फेसबुकच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील तरुणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर यांना फोनद्वारे दिली. करंदीकर यांनी कार्यतत्परतेने पावलं उचलत धुळे पोलिसांच्या मदतीने अवघ्या २५ मिनिटांत सदर २३ वर्षीय युवकाचे प्राण वाचविले. कर्तव्यदक्ष मुंबई व धुळे पोलिसांनी संयुक्तपणे केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. वेळेवर माहिती देणाऱ्या फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार मानतो”, असं ट्विट देशमुख यांनी केलंय.

Leave a comment

0.0/5