दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक (President gallantry medal) जाहीर झाले असून सर्वाधिक पदकं गडचिरोली जिल्ह्याला मिळाली आहेत. गडचिरोली पोलिस दलातील तब्बल 12 पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आलेलं आहे.
रामपल्ली (मादाराम) जंगल परिसरात झालेल्या नक्षल चकमकीत पोलिस पथकाची यत्किंचितही हानी होऊ न देता नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावून तथा हल्ला परतावून लावत तीन नक्षलवाद्यांना ठार करुन मोठा शस्त्रसाठा जप्त करणाऱ्या नऊ पोलिसांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आलंय. दुसरीकडे निहायकल-हेटलकसा चकमकीत दोन जहाल नक्षलींना ठार करणाऱ्या तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त झाले.
माओवादविरोधी कारवाईत 2018 मध्ये बोरीयाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते. त्या कारवाईचे नेतृत्व करणारे तत्कालीन माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी तसेच प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक राज या दोन वरिष्ठ पोलीस अधिका-यासह सी सिक्स्टी कमांडो पथकाच्या जवानांना हे शौर्य पदक जाहीर झाले आहे. याशिवाय एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस हवालदार तसेच पाच पोलीस नाईक आणि 3 पोलीस अमलदार यांचा यात समावेश आहे.
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालीय. यावर्षी एकूण 119 पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात 29 महिलांचाही समावेश आहे. याशिवाय 10 परदेशी नागरिक, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार आणि एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.
महराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्ती
- रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)
- परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)
- नामेदव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य)
- जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय)
- गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)
- सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)