Maharashtra Budget 2021: शहरांमधील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यास प्राधान्य

महाराष्ट्र बुलेटिन : सोमवारी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरणासह पायाभूत सुविधांच्या विकासावर देखील अधिक भर देण्यात आला. यामध्ये शासनाने मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे येथील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मद्य वगळता अन्य कोणत्याही वस्तूंच्या किमतीत वाढ केलेली नाही.

कोरोनाच्या शिरकावामुळे आर्थिक नियोजन हे मोठ्या प्रमाणात कोलमडले आहे. असे असताना १० हजार २२६ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात महिला व शेतकरी वर्गाला दिलासा देण्यात आला असून पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच अजित पवारांनी असे देखील सांगितले की २०२०-२१ या सरत्या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजात कोरोनाच्या संकटामुळे ७० हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे अपेक्षित होते, दरम्यान ३१ मार्चपर्यंत जर ही रक्कम मिळाली नाही तर ही तूट १ लाख कोटींवर जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मुंबई, ठाण्याच्या विकास प्रकल्पांचा देखील उल्लेख केला. त्यांनी सांगितले की ठाणे खाडीला समांतर १५ किलोमीटर लांबीचा ठाणे किनारपट्टी रस्ता बांधण्यात येत आहे. तसेच वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्ग प्रकल्पांचे भूसंपादन देखील सुरु करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी जलवाहतूक सुरु करण्यात आली असून त्याकरिता मीरा भाईंदर, डोंबिवली, कोलशेत व काल्हेर अशा चार ठिकाणी जेटी बांधण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here