शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदेंनी केली मागणी, ‘या’ फ्रेंच डेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपने जागतिक महिला दिनानिमित्त एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात महिलांच्या डेटिंगबद्दल माहिती देण्यात आली. सध्या या अहवालाची जोरदार चर्चा होत असून या अहवालामध्ये ४८ टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या अहवालावर शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व या अहवालावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला आहे.

विधान परिषदेत बोलताना डॉ. मनीषा कायंदे यांनी ग्लिडेनच्या या अहवालाकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, आज महिला दिनानिमित्त आपण भारतीय महिलांच्या यशोगाथा ऐकत असतो, वाचत असतो आणि नेमक्या त्याच दिवशी ग्लिडेन नावाच्या एका फ्रेंच अ‍ॅपने म्हटले आहे की, त्यांनी जवळपास ६० कोटी लोकांचा सर्वे केला असून त्यामध्ये भारतीय महिलांचा देखील समावेश आहे, या अहवालानुसार ६० कोटी महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात असे त्यांनी सांगितले आहे. हा भारतीय महिलांना बदनाम करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या की, “नेमकं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे, तो अतिशय घृणास्पद आणि निंदनीय असा आहे. हा सर्वे खोटा असून भारतीय महिला हे कदापि सहन करणार नाहीत, यामध्ये महिलांची बदनामी करण्यात आली असून त्यांनी या सर्वेला वृत्तपत्रातही प्रसिद्ध केले आहे. मार्केटिंग करणे हा त्यामागील उद्देश असून त्यासाठी भारतीय महिलांची बदनामी करणे चुकीचे आहे. देशात कष्टकरी, शेतकरी महिला आहेत, कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. या अ‍ॅपवर बंदी आणण्याचे निर्देश तात्काळ देण्यात यावेत,” अशी मागणी डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. या प्रकरणात सभापती रामराजे निंबाळकर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्याबाबत केंद्राशी चर्चा करावी असे निर्देश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here