महाराष्ट्र बुलेटिन : राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशातच दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. जेणेकरून कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेपासून जनतेचे संरक्षण करता येईल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबतीत देखील राज्यांना सूचना केल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून राज्य सरकारतर्फे केंद्राकडे एक महत्वाची मागणी केली गेली.
४५ ते ६० वर्ष वयोगटातील फक्त आजारी असलेल्या व्यक्तींना देशभरात लस देण्यात येत आहे. मात्र सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस देण्यात यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारपुढे मांडण्यात आला. दरम्यान केंद्रीय मंत्रालयाने या बैठकीदरम्यान एका सादरीकरणाच्या वेळी ‘सध्या केवळ गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना लस दिली जात आहे, येणाऱ्या काळात ही अट हटविली जाईल,’ अशी माहिती दिली.