तेजस ठाकरे व टीमने शोधलेल्या ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ या दुर्मिळ माशाच्या घराला वारसा स्थळाचा दर्जा

महाराष्ट्र बुलेटिन : सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील २.११ हेक्टर क्षेत्रामध्ये ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ (देवाचा मासा) ही माशाची दुर्मिळ प्रजाती आढळून येते. त्यामुळे या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. महसूल व वन विभागाने या ठिकाणाला वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबतची अधिसूचना आज प्रसिद्ध केली आहे.

अ‍ॅक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास वन्यजीव संशोधकांनी सादर केला आहे. या संशोधनामुळे आंबोली परिसरातील जैवविविधतेत भर पडणार असून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हेरिटेजचा दर्जा मिळणारे देशात हे पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्तुरा हिरण्यकेशी या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला आहे. दरम्यान येथील ग्रामस्थांची देखील मागणी होती की या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा मिळायला हवा.

हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाजवळ शिस्तुरा हिरण्यकेशी ही माशाची दुर्मिळ प्रजाती आढळून येते. दरम्यान मासेमारीमुळे ही प्रजाती धोक्यात येण्याची शक्यता वाढली होती. मात्र महसूल व वन विभागाने आज जो निर्णय घेतला त्यामुळे हा धोका कमी झाला आहे.

या भागाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे पुरातन काळातील हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. या कुंडामध्ये व नदीच्या पात्रामध्ये शिस्तुरा हिरण्यकेशी हे मासे आढळतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात हरीण, गवे, बिबट्या, माकड, शेकरू, अस्वल, साळींदर, खवले मांजर, मुंगूस, वानर आदी वन्यजीव आढळून येतात तर साग, आंबा, फणस, अंजन, जांभा, उंबर, जांभूळ, ऐन, किंजळ अशा विविध वृक्षांच्या प्रजाती, झाडे-झुडपे, वेली व विविध पक्षांचे अस्तित्व पाहायला मिळते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here