Skip to content Skip to footer

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मध्ये मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापणा

शिरोळअण्णासाहेब पटवर्धन यांच्या अधिपत्याखाली असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरणवाडी हि संस्थानकालीन नगरी कुरुंदवाड शहर म्हणून नावारूपास आले. संस्थानकालीन नगरपरिषद असल्याने कुरुंदवाडला शहर म्हणून ओळखले जात असले तरी त्याचा तोंडावळा मात्र गावाचाच असा आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गाव हे परिसरतील २०- २५ गावांसाठी राजधानी आहे. बाजारहाट दवाखानाआदी कामासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिध्द. सर्वाधिक मराठा पाठोपाठ मुस्लिम नंतर दलित धनगर जैन लिंगायत व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या. अठरापगड जातीधर्म पंथ पक्ष विचारधारेचे लोक अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहतात. मुस्लिम समाजाची संख्या मोठी असलीतरी अपवाद वगळता शहरात कधी धार्मिक वाद नाही की धर्माच्या नावाखाली तणावाचे वातावरण नाही. गणपती व हजरत दौलतशहा वलींना ग्रामदैवताचा दर्जा आहे, भु गंधर्व रहिमत खाँ यांची तुरबत इथं असून प्रतिवर्षी संगीत रजनीच्या माध्यमातून त्यांचे स्मरण न चुकता केलं जातं ७०- ७५ वर्षापासून पाच मशीदीत होणारी गणपतीची प्रतिष्ठापना ही सामाजिक सलोख्याची वीण घट्ट करणारी परंपरा इथल्या हिंदु मुस्लिमांनी निर्माण केली आहे व ऐक्याचा नवा आदर्श धर्म मार्तंडासमोर ठेवला. ज्या ज्यावेळी राज्यात देशात धार्मिक तेढ तणाव निर्माण होतो त्या त्यावेळी कुरुंदवाडचा मशीदीतील गणपती, मोहरमधील हिंदु बांधवांचा जोशपूर्ण सहभागाचा आवर्जून उल्लेख होतो.

पटवर्धन संस्थानिकांपासूनच शहरात सामाजिक सलोखा राखण्याची निर्माण झालेली परंपरा आजअखेर कायम आहे. गणपती हे पटवर्धनांचे कुलदैवत असलेतरी संस्थानिक इथल्या बडेनालसाब पीरपंजा (सरकारी पीर) ची सेवा मोठ्या भक्तीभावाने करीत होते. मोहरमसणात १०व्या दिवशी बडेनालसाब पीर राजवाड्यात जाऊन कुलदैवत गणपतीचे दर्शन घेवून नंतर अन्य पीरपंजाची भेट घेत. इथल्या मोहरम सण हिंदू मुस्लिम साजरा करतात. मुस्लिम बांधव मोठ्या मनाचे श्रद्धेने मशिदी मधील श्री गणेश आणि पीर पंजा ची पूजा करतात.

१९८२ साली कारखाना पीर, ढेपणपूर मशीद, बैरगदार मशीद, शेळके मशीद व कुडेखान मशीद अशा पाच मशीदीत श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील दिलावर बारगीर अरुण चव्हाण विलास निटवे रामसिंग रजपुत इलाई भिलवडे महादेव माळी गुलाब गरगरे बाबासो भबिरे रसुल बागवान आप्पा भोसले वली पैलवान शंकर पाटील हिंदुराव खराडे जहांगीर घोरी गुंडु बागडी बापू आसंगे खबाले गुरुजी आदिंनी त्यात पुढाकार घेतला आहे. देशात बाबरी मशीद पतनानंतर व 2009 साली झालेल्या मिरज दंगलीत हिंदु मुस्लिम संघर्ष झाला तरी त्याचा विपरित परिणाम इथल्या उत्सवात झाला नाही.

तिथीनुसार मोहरम व गणपती सण साधारणतः ३६ वर्षानी एकत्र येतात. १९८२ नंतर यंदा ही पर्वणी आली आहे. श्रींची मूर्ती व पीरपंजाची प्रतिष्ठापना मशीदीत मोठ्या उत्साहात यापूर्वी झाली होती आणि या वर्षीही होणार आहे. यामुळे दोन्ही सण उत्सव एकत्रित आल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पटवर्धन संस्थानिकाबरोबरच तत्कालीन दि गणेश बँकेचे सर्वेसर्वा का. स. जोशी यांनीसुध्दा भू गंधर्व रहिमत खाँ यांच्या स्मरणार्थ संगीत रजनी सुरु केली बैरगदार मशीदीच्या जीर्णोद्धारात पुढाकार घेतला.

मंदिरातही पीरपंजाची प्रतिष्ठाणा

शहरातील श्री पंत मंदिर मध्ये गणपतीमूर्ती प्रतिष्ठापना केली जाते मात्र गेल्या 30 वर्षापासून या मंदिरात मोहरम सण साजरा करून पीर पंजाची प्रतिष्ठापना केली जाते. मंदिरात मोहरम सणानिमित्त पीर पंजाची प्रतिष्ठापणा तसेच येथील तिरंगा गणेश मंडळ व अकबरअली मोहरम कमिटी एकत्र येऊन दोन्ही मंडळानी एकत्र मिळून एकाच मंडपात गणेशमूर्ती व पीर पंजाची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐकतेचा संदेश संपूर्ण देशात कुरुंदवाडकरांनी दाखवून दिला आहे.

Leave a comment

0.0/5