पंजाब राज्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. परंतु मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना कर्जाची कुठलीच काळजी नसून त्यांनी आपल्यासह मंत्री, आमदार आणि नोकरशहासांठी अलिशान गाड्या विकत घेण्याचे ठरवले आहे. पंजाब राज्याच्या परिवहन विभागाने 18 लँड क्रूजर गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. या 18 गाड्यांपैकी दोन गाड्या या बुलेटप्रूफ आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील कर्माचार्यांसाठी 13 महिंद्रा स्कॉर्पियो, विशेष ड्युटीवर असलेल्या कर्मचार्यांसाठी 14 मारूती डिजायर विकत घेण्याचा प्रस्ताव होता. तसेच या प्रस्तावात 18 लँडक्रूजरचाही समावेश होता ज्याला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. या 18 लंडक्रूजरमध्ये दोन बुलेटप्रूफ गाड्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्या सामील होतील.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आधीच अलिशान गाड्या आहेत, ज्यात सहा मित्सुबिशी मोंटेरो आणि ऍंम्बेसेडर गाड्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सिंह यांनी 17 कॅबिनेट मंत्र्यांना टोएटा फॉर्च्युनर गाड्या विकत घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच आमदारांसाठी 97 टोएटा क्रेस्टा विकत घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
पंजाब राज्यावर सध्या एक लाख 95 हजार कोटींचे कर्ज आहे आणि या गाड्या विकत घेतल्याने राज्याच्या तिजोरीवर 80 कोटींचा भार पडणार आहे.