चक्क ऑपरेशन थियेटरमध्ये सेल्फी घेणारी ओडिशातील एक अतिउत्साही महिला डॉक्टर अडचणीत आली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ओडिशातील कोरापुट जिल्हा मुख्यालय रुग्णालयात ( डीएचएच) हा प्रकार घडला. या रुग्णालयात एक गर्भवती महिला दाखल झाली होती. तिला प्रसूतीसाठी ऑपरेशन थियेटरमध्ये नेले असताना आणि तिच्यावरील शस्त्रक्रिया चालू असताना तेथील डॉ. सस्मिता दाश यांनी सेल्फी घेतली होती.
इतकेच नव्हे तर हा फोटो नंतर त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. तो व्हायरल झाल्यानंतर त्या छायाचित्रावर चोहोबाजूंनी टीका झाली. तेव्हा मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (सीडीएमओ) डॉ. ललित मोहन रथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, आपण ही सेल्फी घेऊन डीएचएचमधील डॉक्टरांच्या व अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पोस्ट केली होती. यात काहीही चुकीचे नव्हते, असा दावा डॉ. दाश यांनी केला आहे.
‘ओटीमध्ये ऑपरेशन सुरू झाल्याची माहिती सीडीएमओला देण्यासाठी सेल्फी घ्यावी, हा डॉक्टरांनी सामूहिक निर्णय घेतला होता. या ऑपरेशन थियेटरचे नुकतेच पुनर्नवीकरण झाले होते व त्यानंतरची ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. त्यामुळे हा एक खास प्रसंग होता,’ असे डॉक्टर दाश यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.