लखनौ: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर आता अयोध्येत भगवान श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्याची तयारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या पुतळ्याची उंची 151 मीटर असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे बोलले जात आहे.
सरदार वल्लभ भाई पटेल यांची गुजरातमध्ये नर्मदेच्या किनारी उभारण्यात आलेली मूर्ती 182 मीटरची असून जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. तर योगी अयोध्येत श्रीरामाची मूर्ती उभारणार आहेत. ही मूर्ती तांब्याची असेल. या मूर्तीची उंची आधी 100 मीटर ठरली होती. मात्र आता या मूर्तीची उंची 151 मीटर करण्याचे ठरले आहे.