अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले.
‘आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, प्रश्न विचारणारच. त्यामुळे मंदिर निर्माणाची तारीख सांगा’, अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून मोदी सरकारला ठणकावलं. तसेच जर अध्यादेश आणत असाल तर शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.
‘आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी इथे श्रेयवादाच्या लढाईसाठी आलो नाही. तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलो आहे. तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! जे आश्वासन जनतेला, हिंदूंना दिलं होतं त्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. दिलेलं वचन पूर्ण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे’, असं त्यांनी सांगितलं.