भारतीय सैन्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आपण देखील अनेकदा अभिमानाने बरेच फोटो शेअर करत असतो. त्यापैकी बरेच फोटो हे भारतीय सैनिकांचे असतात देखील पण कधी कधी दुसऱ्या देशातील सैनिकांचे फोटो देखील आपण शेअर करतो.
सध्या असेच काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पोस्टमध्ये २ फोटोंना जोडून एक करण्यात आले आहे. यामध्ये सेनेचे युनिफॉर्म घातलेले २ सैनिक दिसत आहेत. एक सैनिक हातात बंदूक घेऊन बसलेला आहे तर दुसरा झोपलेला दिसत आहे. त्यांच्या वर बर्फाची चादर झाकलेली दिसत आहे.
“सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा रात्रीचा फोटो,भारतीय सैन्यास सलाम. जय हिंद” या स्वरूपाचे मेसेज या फोटोसोबत व्हायरल झाले आहेत. अनेक फेसबुक पेज आणि ग्रुपवर हे फोटो शेअर केले आहेत.
मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये हे मेसेज व्हायरल झाले आहेत. या फोटोंना २०१७ मध्ये किरण खेर आणि श्रद्धा कपूर यांच्या सारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी देखील हे फोटो शेअर केले होते. सध्या थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा हे फोटो व्हायरल झाले आहेत.
काय आज सत्यता?
या फोटोंची बुमलाईट या वेबसाईटने सत्यता पडताळून बाहेर आणली आहे. हा फोटो पहिल्यांदा २०१२ मध्ये व्हायरल झाला होता. हा फोटो रुस आणि युक्रेनच्या संघर्षादरम्यानचे आहेत. स्टॉप फेक साईटनुसार हे फोटो रुसच्या सैनिकांचे आहेत. भारतीय सैनिकांचे म्हणून व्हायरल झालेले हे फोटो रुसच्या सैनिकांचे आहेत.
भारतीय सैनिक सुद्धा खूप कठीण परिस्थितीत सियाचीन सारख्या दुर्गम भागात आपलं कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवण्यासाठी अशा फेक फोटोंची काही गरजच नाही. भारतीय सैन्याचे शौर्य दाखवण्यासाठी खोट्या फोटोंचा प्रसार होत असेल तर तो थांबवणे आपलं कर्तव्य आहे.