ट्रक चालकाला ठोठावला चक्क 86 हजार 500 रुपयांचा दंड

ट्रक | The truck driver was fined Rs. 86,500

देशात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटर आणि वाहन कायदा लागू झाला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड करण्यात येत आहे. त्यातच ओडिसामधील एका ट्रकचालकाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून चक्क 86 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संभलपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

तर, ज्या चालकावर कारवाई करण्यात आली त्याचे नाव अशोक जाधव असे आहे. जाधव चालवत असलेल्या ट्रकचा क्रमांक एनएल 01 जी 1470 आहे. हा ट्रक नागालॅंडमधील आहे. मात्र या चालकाने पोलिसांबरोबर पाच तास हुज्जत घालती आणि काही कागदपत्र सादर केल्यानंतर त्याला 70 हजारांचा दंड भरण्यास सांगण्यात आले. 3 सप्टेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ कार्यालयात भरल्यानंतर ट्रक त्याच्या ताब्यात देण्यात आला. या इतक्‍या मोठ्या दंडाच्या पावतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

का झाला इतका दंड
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृतरित्या पुरेशी कागदपत्रे नसताना अवजड वाहनाचा चालक म्हणून काम केल्याप्रकरणी पाच हजार रुपये, परवाना नाही म्हणून पाच हजार रुपये, क्षमतेपेक्षा अधिक अवजड सामान वाहून नेत असल्याप्रकरणी 56 हजार रुपये, क्षमतेपेक्षा अधिक आकाराचे सामान वाहून नेणे 20 हजार रुपये आणि कागपत्रांसंदर्भातील 500 रुपये दंड या चालकाला लगावण्यात आला. हा ट्रक ओडिसाहून छत्तीसगडला जात होता. याच मार्गावर संभलपूर क्षेत्रातून जाताना ट्रकचालकावर ही कारवाई करण्यात आली. या ट्रकमधून जेसीबी क्रेनची वाहतूक केली जात होती. हा ट्रक नागालॅंडमधील बीएलए इंफ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here