भाजपाच्या महिला मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल
मध्य प्रदेशमधील सत्ताधारी भाजपाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या इमरती देवी यांचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये इमरती देवी यांनी आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ शकत नाही असा दावा केला आहे. आपला जन्मच गायींचे शेण आणि मातीच्या सानिध्यात झाला आहे, असं इमरती देवी या व्हिडिओमध्ये पत्रकांना सांगत आहेत.
मागील काही दिवसांपासून इमरती देवी यांनी करोनाची लागण झाल्याची राज्यभरात चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ग्वालियरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला करोनाचा संसर्ग झाल्याची चुकीची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे असं म्हटलं. बरं एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्याला करोनाचा संसर्ग होणार नाही असा दावाही केला. “इमरती देवीचा जन्म या मातीतला आहे. शेणाच्या सानिध्यात जन्म झालाय माझाल. माझ्या आजूबाजूला एवढे सारे किटाणू आहेत की करोना माझ्या आजूबाजूलाही येऊ शकत नाही,” असं इमरती देवी यांनी पत्रकारांना सांगितलं. ही घटना तीन सप्टेंबरची असून त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेण्यासाठी इमरती देवी या ग्वालियरमध्ये आल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी पत्रकांना आपल्याला करोना झालेला नाही अशी माहिती दिली.
इमरती देवी यांनी ज्योतिरादित्य शिंदेंची भेट घेण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी सरकारी कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. याच बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्या बैठक अर्ध्यात सोडून गेल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर इमरती देवी यांनी करोनाचा संसर्ग झाल्याची चर्चा राज्यामध्ये सुरु झाली. त्याच दिवशी त्या संध्याकाळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांबरोबरच्या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. याचवर त्यांनी थोड्या रागाच्या भरातच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत मला करोना संसर्ग झाल्याचे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं.
मैं गोबर में पैदा हुई हूं इतने कर्रे कीटाणु है कि #कोरोना नहीं आएगा – #मंत्री_इमरती_देवी
ठीक है मान ली आपकी बात #imartidevi #MadhyaPradesh #ShivrajSinghChauhan pic.twitter.com/AaK3ZcJ4pr— Kumar kundan ostwal (@OstwalKumarp) September 4, 2020