तो २८ वर्षांचा होता तर ती अवघ्या १९ वर्षांची होती
करोनामुळे देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. देशातील बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. आर्थिक संकट आणि बेरोजगारीची समस्या दिवसोंदिवस अधिक गडद होत चालली आहे. आर्थिक संकटाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर येत असतानाच हरयाणामधील पानीपतमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील राज नगरमध्ये आपल्या राहत्या घरी एका नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांची नावे आवेद (२८) आणि त्याची पत्नी नजमा (१९) अशी आहेत. आवेदचा मोठा भाऊ जावेदने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आवदेचे १० ऑगस्ट रोजी नजमासोबत लग्न झालं होतं. आपल्या आवडत्या मुलीबरोबर लग्न झाल्याने आवेद आनंदात होता. जावेदने दिलेल्या माहितीनुसार आवेद एका खासगी कंपनीमध्ये वेल्डर म्हणून काम करायचा. मात्र करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये त्याची नोकरी गेली. अनलॉकनंतर आपल्याला पुन्हा नक्की नोकरी मिळेल असा आवेदला विश्वास होता. मात्र अनेक प्रयत्न करुनही त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून तो मानसिक तणावामध्ये होता.
बुधवारी सकाळी आवेदला त्याचा मित्र नफीस भेटायला आला होता. त्यावेळी नफीसने निराश होण्याऐवजी नोकरी शोध असा सल्ला त्याला दिला. नफीस निघून गेल्यानंतर आवेद आपल्या खोलीमध्ये गेला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या पत्नीने सकाळी साडे नऊच्या सुमारास पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जावेदची पत्नी चांदणी हीने या दोघांचे पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहिल्यानंतर घरच्यांना सांगितले. घरच्यांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
जावेदने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील अनवर खान हे सूत कातण्याच्या कारखान्यामध्ये काम करतात. तर जावेद स्वत: एका दुकानामध्ये कॅशियर म्हणून कामाला आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कधीही आवेदवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकला नाही. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून निराश होता असं जावेदने पोलिसांना सांगितलं. आवदेचे वडील अनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरी गेल्यापासूनच आवेद नोकरीच्या शोधात होता. कुटुंबाने कोणाविरोधातही शंका असल्याची माहिती दिलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.