कृषी विधेयकाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवला.
संसदेत केंद्र सरकारने शेतकरी संघटनेचा विरोध डावलून आवाजी मतदानाद्वारे समंत करण्यात आलेल्या कृषी विधेयकावर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आता विधेयकाना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यानंतर कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीतील इंडिया गेटवर आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवून विरोध दर्शवला .
त्यात राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात आंदोलन सुरु आहे. सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून, त्यापैकी ५ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.