शिवसेना पक्षाचा ‘मोदी हटाव देश बचाव’चा नारा
मोदी सरकारने पारित केलेला कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना कोल्हापूर शहराच्या वतीने खानविलकर पेट्रोल पंप ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याला हजारोच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोर्चावेळी ‘मोदी हटाव, देश बचाव’, ‘ईडा पीडा टळो बळीराजाचे राज्य येवो, असे नारे शिवसैनिकांकडून देण्यात आले होते. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. शेतकरी जगला तर आपण जगू. आज शेतकऱ्यांवर संकट आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्याऐवजी मोदी सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे नव्याने करण्यात आलेले कायदे रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरीविरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला. तर, एवढ्या वर्षांची मैत्री असलेला शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला.