या प्रकल्पासाठी १४.१ मिलियन डॉलरचा निधी मंजूर
एखादा अंतराळवीर आपल्याला अवकाशात इकडे तिकडे फिरताना लाईव्ह दिसतोय. आपल्या यानासोबत घेतलेले सेल्फी तो थेट ट्विट करत आहे. दुसरा एक अंतराळवीर चंद्रावर टिपलेले भारी फोटो आणि व्हिडीओ थेट अवकाशातून पोस्ट करतोय. या बाबी तुम्हाला कपोकल्पित वाटत असतील मात्र लवकरच हे सर्व सत्यात उतरणार आहे.
यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत. चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.
नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे. या प्रकल्पासाठी १४.१ मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.
आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे. यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”
आपल्या अनेक ट्विट्समध्ये बेल लॅब्सने म्हटलं की, “चंद्रासाठी! चंद्राच्या पृष्ठभागावर मानवी अस्तित्वाचा मार्ग मोकळा करण्यासाठी, चंद्रावर टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाची प्रगती करण्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार म्हणून नासाने आपले नाव निश्चित केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.”
आमचं अग्रणी संशोधन हे चंद्रावर पहिलं वायरलेस नेटवर्क स्थापित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याची सुरुवात 4G/LTE नेटवर्कपासून होईल ते 5G नेटवर्कपर्यंत पोहोचेल. याला ‘ग्राऊंडब्रेकिंग नेटवर्क’ म्हणून संबोधण्यात येईल. डेटा पाठवण्यासाठी हे क्रिटिकल कम्युनिकेशन फॅब्रिक असेल. याद्वारे चंद्रावरील रोव्हर्स, चंद्राच्या भूभागावरील रियल टाईम नेव्हिगेशन आणि हायडेफिनेशन व्हिडिओ याद्वारे चित्रीत करता येतील, असं इतर ट्विट्समध्ये बेल लॅब्जने म्हटलं आहे.
बेल लॅब्जने आणखी काही ट्विटमध्ये म्हटलं की, हे LTE नेटवर्क खासकरुन अवकाशातील सर्वाधिक तापमान, रेडिएशन आणि निर्वात पोकळीतही काम करेल अशा पद्धतीने बनवण्यात येणार आहे. ही योजना भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे आपले प्रयत्न अधिक बळकट करेल.