बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचे मोफत कोरोना लस वाटण्याचे आश्वासन
भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिलेली आहे. मात्र या जाहीरनाम्यात दिलेल्या एका आश्वासनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने कोरोना संसर्गाची लस मोफत वाटण्याचे आश्वासन दिलेले आहे. या संदर्भातील घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केलेली आहे. निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत मास्क वापरणे गरजेचे आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर तिचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन केले जाईल.
बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच भारतीय जनता पक्षाच्या या जाहीरनाम्यात बिहारमधील बेरोजगार तरुणांसाठी १९ लाख रोजगारांची निर्मिती, क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापन अशा घोषणांचा पाऊसच पडला आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बिहार एक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वासही निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.