Skip to content Skip to footer

लस फक्त बिहारलाच, मग इतर राज्ये पाकिस्तानात आहेत का? – सामना


लस फक्त बिहारलाच, मग इतर राज्ये पाकिस्तानात आहेत का? – सामना

भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिलेली आहे. मात्र या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी मोफत वॅक्सीन अर्थात कोरोना लस वाटण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. हाच मुद्दा पकडत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपाला चिमटा काढण्यात आलेला आहे.

‘बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारसाठीच्या घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे!’, अशी टीका शिवसेनेने सामना मधून केलेली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, कोरोनावर ‘लस’ येताच ती देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. पंतप्रधानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही. पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे.

कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहेच, पण भाजपच्या जाहीरनाम्यातही तसे वचन पहिल्या क्रमांकावर दिले आहे. बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोना संसर्गाच्या काळात होणारी पहिलीच मोठी निवडणूक आहे. व्हर्च्युअल सभा होतील व इतर नेहमीचे उद्योग होणार नाहीत असे वातावरण निर्माण झाले होते. पण बिहारात मैदानात जाहीर सभा सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रम होत आहेत. नेत्यांची हेलिकॉप्टर्स उडत आहेत व प्रचंड गर्दीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या गर्दीत बहुधा ‘कोरोना’ चिरडून मरणार व राजकीय क्रांती होणार असेच चित्र बिहारात आहे, असे आजच्या सामना अग्रलेखात परखड मत मांडण्यात आलेले आहे.

Leave a comment

0.0/5