‘द डिव्हाईन -७८०१ ब्रह्म वज्र कमलम’ असं देण्यात आलं नाव
हैदराबाद येथील दागिन्यांच्या एका व्यापाऱ्याने जागतिक विक्रम नोंदवला आहे. बोटात घालावयाच्या एका अंगठीमध्ये जास्तीत जास्त हिरे बसवल्याबद्दल गिनेस बुक ऑप वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा विक्रम नोंदवला गेला आहे.
कोट्टी श्रीकांत असं हा विक्रम रचणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव असून ते एका हिऱ्याच्या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी फुलांच्या आकाराच्या एका अंगठीमध्ये ७,८०१ हिऱ्यांचा वापर केला आहे. अंगठीत इतक्या मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांचा वापर करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
या अंगठीला ‘द डिव्हाईन -७८०१ ब्रह्म वज्र कमलम’ असं नाव देण्यात आलं आहे. हिमालयात सापडणाऱ्या दुर्मिळ अशा ‘ब्रह्मकमळ’ या फुलापासून ही अंगठी साकारण्याची प्रेरणा मिळाल्याचे या व्यापाऱ्याने म्हटलं आहे.
भारतात देवांना फुलं अर्पण करण्याची प्रथा आहे. फुलांचा सुगंध हा शुद्धतेचं प्रतिक आहे. त्यामुळे फुलाच्या रुपातच आपण हे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे कोट्टी यांनी गिनेस बुकच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं.
जागतीक विक्रम केलेली अंगठी कशी साकारली
जागतीक विक्रम अशी नोंद झालेल्या या अंगठीच्या निर्मितीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यानुसार, या अंगठीत सहा पदर आहेत. पहिल्या पाच पदरांमध्ये प्रत्येकी आठ पाकळ्या आहेत. तर शेवटच्या पदरावर सहा पाकळ्यांसह मध्यभागी तीन तंतू आहेत.
ज्वेलर्सच्या वेबसाईटनुसार, अंगठीच्या डिझाइनच्या निर्मितीला सप्टेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. डिझाइन फायनल झाल्यानतंर ज्वेलर्सच्या टीमने या डिझाइनच्या अंगठीत किती हिरे बसतील हे पडताळणीसाठी कॉम्प्युटरवर डिझाइन तयार केलं.