Skip to content Skip to footer

संसदेत दणाणला मराठी आवाज! “संसदेत आणि विधिमंडळात महिलांना ५० टक्के आरक्षण…”

महाराष्ट्र बुलेटिन : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दरम्यान राज्यसभेत महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिला दिनानिमित्त संसदेतील महिला खासदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगताद्वारे महिला खासदारांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर जोर देत आपल्या भूमिका मांडल्या. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की, देशात महिलांची संख्या निम्मी असताना प्रस्ताव ३३ टक्के आरक्षणाचाच का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनीही महिला आरक्षणावर आपले मत स्पष्ट केले.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, “देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव होता. परंतु आता हे आरक्षण वाढविण्याची गरज आहे. महिलांना ३३ टक्क्यांवरून ५० टक्के आरक्षण देऊ केलं पाहिजे. आज देशात एकूण लोकसंख्येच्या अर्धी संख्या महिलांची आहे, असे असताना संसदेत आणि विधिमंडळात महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेच गेले पाहिजे.”

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. या काळात महिलांवर प्रचंड ताण पडला. मग तो कौटुंबिक असो की मग मानसिक असो, या सर्वांचा सामना महिलांना करावा लागला आहे. या अनुषंगाने सभागृहात सखोलपणे चर्चा व्हायला हवी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत.” असेही प्रियंका चतुर्वेदींनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

तसेच राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी देखील महिला आरक्षणावर आपली भूमिका मांडली. त्या म्हटल्या की, “आज नेतृत्व करणाऱ्या महिलांची संख्या केवळ ६ टक्के आहे. यावर सर्वांनी विचार करायला हवा. राज्यसभा आणि लोकसभेत कायदा करून महिलांना आरक्षण देण्याची सुरुवात आपण करू शकतो.”

Leave a comment

0.0/5