माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्याराज्यांतील जम्बो मंत्रिमंडळांवर नियंत्रण आणले आणि दूरदर्शी राजकारणाचा अंगीकार करीत सरकारी पैशांची उधळपट्टी आणि शासकीय मालमत्तेची नासाडी थांबवली. त्यामुळे सरकारचा पंधरा टक्के पैसा वाचला अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये वाजपेयी यांच्या स्वच्छ आणि दूरदर्शी राजकारणावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनाची बातमी कळताच देशातील कोटय़वधी नागरिक शोकसागरात बुडाले. देशाला विधायक आणि प्रगतीच्या मार्गावर नेणारा एक महान नेता हरपला, अशीच भावना प्रत्येक नागरिकात होती. हीच या महान नेत्याला वाहिलेली खरी आदरांजली होती, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे बोल
बलात्काराच्या गुन्हय़ात दोषींना किमान 10 वर्षे शिक्षा होईल. 12 वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा होईल. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये दोन महिन्यांतच न्यायालयाने निकाल दिला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा सुनावली. महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळेच संसदेत विधेयक पारित करून कठोर कायदा करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व जमातींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी याच अधिवेशनात दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आले. या कायद्यामुळे दलित समाजामध्ये विश्वास निर्माण होईल. मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी ओबीसी आयोग स्थापन करण्यात आला असून त्याला घटनात्मक अधिकारही देण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. देशात केंद्र आणि राज्यांतील निवडणुका एकत्रित करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील लोक आपापली मते मांडत आहेत ही चांगली गोष्ट असून लोकशाहीसाठी शुभसंकेत आहे.