Skip to content Skip to footer

बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, कायदा करायला इतका वेळ का?- संजय राऊत

अयोध्या: बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, मग सरकारला कायदा करायला इतका वेळ का लागत आहे, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. ते शुक्रवारी अयोध्या येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, राष्ट्रपती भवन ते उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. संसदेत राममंदिराला पाठिंबा देणार अनेक खासदार आहेत. जे राम मंदिराला विरोध करतील त्यांना देशात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

केंद्र सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा. शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही मंदिर बांधू, अशी घोषणाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटना यावरुन आमनेसामने आल्यात. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. प्रत्यक्ष अयोध्येतही या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चात आता स्थानिकांमध्येही रंगू लागलीय. अयोध्येतल्या महत्त्वाच्या चौकात उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी फलक झळलेत. फलकांवर उद्धव ठाकरेंचा चेहरा प्रामुख्याने दिसतो. पण, चर्चा मात्र अजूनही बाळासाहेब ठाकरेंच्याच नावाचीच आहे.

उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत. प्रथम संत महंतांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामललाच्या दर्शनला जातील. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल.

Leave a comment

0.0/5