Skip to content Skip to footer

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा निर्णय – मुख्यमंत्री

मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक महाराष्ट्र विधानसभा तसंच विधान परिषदेत बिनविरोध मंजूर झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला आहे.

आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार.

मराठा समाजाच्या आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. त्यावर पुढच्या अधिवेशनात त्यासंदर्भातला ATR मांडणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्याआधी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून होते. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील निष्कर्षांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी बारा वाजता सभागृहात ठेवला. यावेळी काही सदस्यांनी ‘मराठा समाजाचा विजय असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.

या अहवालाच्या शिफारसींनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच जाहीर केलं होतं.

या अहवालात करण्यात आलेल्या शिफारसी अशा –

  • मराठा समाजाच्या लोकांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) म्हणून घोषित करण्यात येईल
  • राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि लोकसेवा आयोगात 16 टक्के आरक्षण मिळणार आहे
  • खासगी, अनुदानीत, विनाअनुदानीत शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळेल. फक्त अल्पसंख्याक संस्थांमध्ये नसेल.
  • ओबीसी समाजाच्या आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल
  • केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण नसेल

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अहवालातील शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला. त्यावर दीड वाजता यावर चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दीड वाजता युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सभागृहाजवळ जमलेल्या मराठा आंदोलकांबरोबर जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.

दरम्यान, धनगर आरक्षणाचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘अहवालातील शिफारसींची छाननी ही मंत्रिमंडळ उपसमिती करणार असल्याचं सांगत लवकरात लवकर तोही मांडायचा प्रयत्न आम्ही करू,’ असं उत्तर दिलं.

शिवसेनेनं ट्विट करून मराठा समाजाचं अभिनंदन केलं आहे.

Leave a comment

0.0/5