पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर अवघ्या दोन तासात पार करता येणे आता शक्य होणार आहे त्यासाठी पुणे नाशिक या लोहमार्गाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. शिवसेना खा. शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. तसेच रेल्वेच्या पिंक बुकात सुद्धा या प्रकल्पाची नोंद करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प देशातील पहिला हाय-स्पीड प्रकल्प म्हणून महाराष्ट्राला या प्रकल्पामुळे मान मिळणार आहे. ताशी २२० की.मी वेगाने धावणाऱ्या रेल्वेमुळे पुणे आणि नाशिक या ठिकाणी कामा निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या लोहमार्गाचा पुरेपूर फायदा होणार आहे आणि नाशिक-पुणे या दोन शहरातील व्यापार वाढीला सुद्धा चालना मिळणार आहे. २३० कि.मी अंतर अवघ्या २ तासात कापता येणार आहे.
या प्रकल्पाला सुमारे ७५०० कोटी इतका खर्च अपेक्षित असून १५०० कोटी राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे गुंतवणुकीतून उभे राहणार आहे. उर्वरीत रक्कम वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांन कडून उभे करण्यात येणार आहे. फेब्रुवारी ते मार्च महिण्यात प्रकल्पाला लागणारी भू-संपादन, निविदा या कामाला सुरवात होणार आहे. २३१.७६१ कि.मी लांबीच्या मार्गाचे ड्रोन सर्वेक्षण सुरु झाले असून १८० कि.मी चे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पासाठी १२ छोटे-मोठे बोगदे बांधण्यात येणार असून सुमारे संपूर्ण बोगद्यांची लांबी १२ कि. मी इतकी असणार आहे. तसेच पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यतील १५ नद्यांवर प्रकल्पासाठी पूल बांधण्यात येणार आहे असे ही रेल्वे खात्याकडून सांगण्यात आलेले आहे.
पुणे आणि नाशिक जिल्यातील अनेक प्रवाशांना हा लोहमार्ग लवकरात लवकर चालू व्हावा अशी आशा होती परंतु येणाऱ्या काही वर्षातच हा प्रकल्प सत्यात उतरणार आहे. अशी अपेक्षा सर्व पुणेकर आणि नाशिककरांना वाटत आहे. रेल्वेच्या पिंक बुकात या प्रकल्पाची नोंदणी असल्यामुळेच हा प्रकल्प होणार असे ही आज बोलले जात आहे. एस के जैन वरिष्ठ रेल्वे अधिकारी, मध्य रेल्वे यांनी सुद्धा पिंक बुकाचा आधार घेऊन लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्गावर असल्याच्या गोष्टींना दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात पुणे-नाशिक हे अंतर अवघ्या काही तासातच पूर्ण होण्याचे स्वप्न जनतेचे सत्यात उतरणार आहे.