कर्नाटकचे काँग्रेस नेते वेलूर गोपालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. वेलूर गोपालकृष्ण यांचा ‘हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना गोळ्या घाला’, अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने थयथयाट करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने मात्र या प्रकरणातून अंग काढून घेत या वक्तव्याला दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे. वाद वाढल्यानंतर वेलूर गोपालकृष्ण यांनी माफी मागत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हटले.
गांधी जयंतीच्या दिवशी हिंदू महासभेच्या नेत्या पुजा शकून पांडे यांनी केलेल्या गोळीबाराच्या कृत्यावर बोलताना वेलूर गोपालकृष्ण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘सध्या लोक महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा उदोउदो करत आहेत. हे समाजामध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत. जर त्यांना लोकशाही संपवून टाकायची असेल तर त्यांच्यामध्ये पंतप्रधान मोदींना मारण्याचीही हिंमत असायला हवी’, असे वेलूर गोपालकृष्ण म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने हल्लाबोल करत वेलूर गोपाल कृष्ण यांच्या अटकेची मागणी केली.
काँग्रेसने हात झटकले
दरम्यान, वेलूर गोपालकृष्ण यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे म्हणत काँग्रेसने हात झटकले आहे. काँग्रेस नेते एम.बी. पाटील म्हणाले की, ‘आम्ही त्यांच्या वक्तव्याची कठोर शब्दात निंदा करतो. ही काँग्रेसची संस्कृती नाही.’ यानंतर वेलूर गोपाल कृष्ण यांनी माफी मागितली आहे.